Newasa News : नेवासा पोलिसांचा गुटखा माफियांना दणका! धाडसी कारवाईत 2.74 लाखांचा माल जप्त

नेवासा : नेवासा शहरात प्रतिबंधित मावा आणि गुटखा विक्री करणाऱ्या माफियांवर नेवासा पोलिसांनी रविवारी (दि. १३) जोरदार कारवाई करत 2 लाख 74 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी चित्रपटातील कथानकाला लाजवेल अशा गनिमी काव्याने ही कारवाई यशस्वी केली. वेषांतर करत, कोणालाही सुगावा लागू न देता त्यांनी शहरात टेहाळणी केली आणि १२ पोलीस पथकांसह आठ जणांवर धाड टाकून मोठा साठा आणि मशिनरी जप्त केली.
गुप्त नियोजन, अचूक कारवाई
खाडे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, परवेज इसाक शेख, वसीम मोहम्मद शेख, सुलेमान इसाक मनियार, अब्दुला अल्ताफ सय्यद, यासीन बाबा शेख, सय्यद अजीम सलीम, जावेद फज्जु शेख आणि अफरोश युसुफ शहा हे नेवासा खुर्द येथील विविध भागांत मावा-गुटखा बनवून विक्री करत आहेत. या माहितीवर खाडे यांनी सर्व पथकांचे मोबाइल जमा करून गुप्तता राखली आणि नियोजित ठिकाणांवर धाडी टाकल्या. यात सुगंधित तंबाखू, मावा तयार करण्याचे मशीन आणि कच्चा-पक्का माल जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाईला सुरुवात
आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम २६, २६(२), २७(३)(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून अवैध धंद्यांना चाप बसला आहे.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
या यशस्वी कारवाईत सपोनि अमोल पवार, पोसई संदीप ढाकणे, विजय भोंबे, विकास पाटील, मपोसई श्रद्धा वैद्य, सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे, पोलीस हवालदार अजय साठे, संतोष राठोड, शहाजी आंधळे, सुधाकर दराडे, महिला पोलीस हवालदार संगिता पालवे, पोलीस नाईक किरण पवार, संजय माने यांच्यासह अनेक कर्मचारी आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला.
जनतेकडून कौतुकाचा वर्षाव
पोलीस उपाधीक्षक खाडे यांच्या धाडसी नेतृत्वामुळे नेवासा शहरातील नागरिकांनी त्यांच्यावर आणि पोलीस पथकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या कारवाईने गुटखा माफियांना चांगलाच दणका बसला असून शहरात अवैध धंद्यांना आळा बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.





