Newasa: धामोरी (ता. नेवासा) येथील शेतकरी दत्तात्रय सदाशिव पटारे यांनी गट रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब अमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या उपोषणामुळे महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पटारे यांनी ७ जून २०२३ रोजी गट नं. ५६ मधील रस्ता खुला करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज दिला होता. मात्र, तीन वर्षे सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर रस्ता शंकर रोहिदास पटारे व अन्य तिघांनी अडवल्याने शेतीची मशागत, ट्रॅक्टर व अवजारे ने-आण तसेच शाळकरी मुलांच्या ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे पटारे यांनी सांगितले. संबंधित रस्ता पूर्वी कागदोपत्री मंजूर असूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.