Newasa : खुल्या कांदा मार्केटची तीन महिन्यांत 7.50 कोटींची उलाढाल; 60 हजार 650 क्विंटल कांद्याची आवक
Newasa : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या कांदा मार्केटमध्ये अवघ्या तीन महिन्यांत ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक झाली असून ७.५० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. रविवारी ९ ऑगस्टला कांदा लिलाव बंद राहणार.

Newasa : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या खुल्या कांदा मार्केटला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन महिन्यांत ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या व्यवहारातून तब्बल ७ कोटी ५० लाख ६५ हजार ३०२ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी दिली.
नेवासा बाजार समितीच्या आवारात ६ मे २०२६ रोजी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या कांदा मार्केटची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी दर मंगळवार आणि गुरुवारी लिलाव भरविण्यात येत होता. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन संचालक मंडळाने रविवारीही लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी होणाऱ्या लिलावालाही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.
तीन महिन्यांचा व्यवहार –
मे ते जुलै या कालावधीत बाजार समितीत एकूण ३ हजार ९२४ वाहनांची नोंद झाली. मे महिन्यात १९ हजार ३८७ क्विंटल कांद्याची आवक झाली असून १ कोटी ४२ लाख २९ हजार ९११ रुपयांची उलाढाल झाली. जून महिन्यात २६ हजार ५५९ क्विंटल कांद्याची आवक झाली. या महिन्यात ३ कोटी २१ लाख ६२ हजार ८९ रुपयांची उलाढाल नोंदविण्यात आली. जुलै महिन्यात २ कोटी ८६ लाख ७३ हजार ३१२ रुपयांची उलाढाल झाली.
हेही वाचा – दोन घासांसाठी आजही भटकंती; लोहार-घिसाडी समाज सरकारी योजनांपासून वंचित
या तिन्ही महिन्यांत मिळून ६० हजार ६५० क्विंटल कांद्याची आवक होऊन एकूण ७ कोटी ५० लाख ६५ हजार ३०२ रुपयांचा व्यापार झाल्याचे सभापती नंदकुमार पाटील यांनी स्पष्ट केले.
दुबईपर्यंत पोहोचला नेवासेचा कांदा –
नेवासे बाजार समितीत उच्च दर्जाचा कांदा उपलब्ध होत असल्यामुळे येथून दुबईला कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे नेवासेच्या कांद्याला परदेशातही मागणी वाढत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
याशिवाय, खुल्या लिलावानंतर शेतकऱ्यांना त्वरित रोख रक्कम अदा केली जात असल्याने उत्पादकांचा विश्वास वाढला आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक दर आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असून, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनामुळे नेवासे कांदा मार्केट राज्यासह परदेशातही ओळख निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला.
परिसरातील शेतकऱ्यांचा वाढता ओढा –
नेवासे बाजार समितीत कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने आसपासच्या तालुक्यांतील कांदा उत्पादक शेतकरीही येथे विक्रीसाठी येत आहेत. कांदा मार्केटमुळे नेवासे शहरातील बाजारपेठेला चालना मिळाली असून, स्थानिक व्यापाऱ्यांनीही बाजार समितीच्या व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
महत्त्वाची सूचना –
रविवार, ९ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कामिका एकादशी यात्रेनिमित्त नेवासे येथे मोठी यात्रा भरत असल्याने त्या दिवशी बाजार समितीतील रविवारचा खुला कांदा लिलाव होणार नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी कांदा मार्केट बंद राहणार असून शेतकऱ्यांनी त्या दिवशी विक्रीसाठी कांदा आणू नये, असे आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केले आहे.





