नेवासे : नेवासे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात व्यापारी आणि शेतकऱ्यांनी साठवलेल्या शेकडो क्विंटल धान्याची अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नासाडी होण्याच्या मार्गावर आहे. चांगला भाव मिळेल या आशेने साठवलेल्या शेतमालावर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संकट उभे राहिले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी व शेतकऱ्यांकडून होत आहे. या गोदामाची साठवणूक क्षमता सुमारे ४,२०० क्विंटल इतकी आहे. शेतकरी आणि व्यापारी प्रति क्विंटल दरमहा शुल्क भरून धान्य साठवतात, जेणेकरून बाजारभाव वाढल्यानंतर ते विकता येईल. मात्र, धुरळणी, जाळी काढणे आणि कीड नियंत्रणासारख्या मूलभूत काळजीकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने धान्य असुरक्षित झाले आहे. परिणामी, शेतमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. व्यापारी व शेतकरी चिंतेत असून, गोदामातील धान्य खराब होत असल्याचे सांगतात. कर्मचारी वेळेवर लक्ष देत नसल्याने आणि व्यापाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरल्याने संताप व्यक्त होत आहे.”आमचे गोदामातील धान्य पूर्णपणे खराब झाले आहे. कर्मचारी वेळीच लक्ष देत नाहीत आणि व्यापाऱ्यांना अरेरावी करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करावी,” अशी मागणी प्रमुख धान्य व्यापारी प्रितम साळुंके यांनी केली आहे.