Newasa News : मार्गदर्शिका मतदारांपर्यंत पोहोचल्याच नाहीत!

नेवासा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जागृती करीता भारत निवडणूक आयोगाने पाठविलेल्या मार्गदर्शिका निवडणुकीनंतर आजही धुळ खात का पडून आहेत? याची चौकशी होऊन संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नेवासा तालुका भारतीय जनसंसदने केली आहे. हुशार मतदार व्हा,मतदार मार्गदर्शिका,तसेच चुनाव का पर्व – देश का गर्व, विधानसभा इलेक्शन २०२४ असा उल्लेख असणाऱ्या लाखो पत्रकांचे भले मोठे गठ्ठे तहसील कार्यालयातील निवडणुक शाखेत अजुनही तसेच पडून आहेत.
मतदार जागृतीसाठी आलेली ही पत्रके मतदारांपर्यंत का गेली नाहीत? की द्यायचीच नाहीत? असाही प्रश्न भारतीय जनसंसदचे नेवासा तालुकाध्यक्ष रामराव भदगले,उपाध्यक्ष कारभारी गरड, डॉ.अशोकराव ढगे, सचिव प्रा.नानासाहेब खराडे, नेवासा शहराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांना पडला असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हे सर्व गठ्ठे निवडणूक शाखेत पाहिल्याने पदाधिकारीही चांगलेच अवाक झाले.
या पत्रकामध्ये मतदार नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाइन कशी करावी,मतदानाच्या दिवशी मतदान करतांना कोणती काळजी घ्यावी, मतदान प्रक्रिया कशी असते,भारत निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले ॲप की,ज्या ॲपवर मतदारांसाठी अनेक सोयी सुविधा दिसून येतात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांसाठी किमान आश्वासित व घरून आणि टपालाने मतपत्रिका पाठवण्याची सुविधा, तसेच मतदारांची प्रतिज्ञा आदिं सविस्तरपणे माहिती आहे.
ही पत्रके विधानसभेच्या निवडणुकीनंतरही सुमारे दोन महिने तशीच पडून आहेत. मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाकडून किती पत्रके आली? मतदारांपर्यंत कोणी? किती? पोहोचवली. हा प्रश्न आता निर्माण झाला असून यामध्ये दोषी असणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नेवासा तालुका भारतीय जनसंसदच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.





