नेवासा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नेवासा पंचायत समिती आणि परीस महिला प्रभाग संघ, भानसहिवरे यांच्या अंतर्गत नेवासा बुद्रुक येथील शक्ती महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत बचत गट तालुका मोहीम व्यवस्थापक अर्जुन सोनवणे यांनी महिलांना बचत गट सक्षम करून कुटुंबाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सभेचे आयोजन नेवासा बुद्रुक येथील विश्वेश्वरनाथबाबा मंदिर प्रांगणातील सभामंडपात करण्यात आले होते. यावेळी अर्जुन सोनवणे, युवा उद्योजक बाळासाहेब मारकळी, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अमृता कहांडळ, सुपरवायझर शैला शिंदे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेषराव पाखरे, गणेश मेहेत्रे, शक्ती महिला ग्रामसंघाच्या सीआरपी मीनाताई काळे, अध्यक्षा स्वाती परदेशी, सचिव संध्या कुटे, आणि आरोग्य केंद्राच्या मेघा नवघरे, सतीश जायगुडे उपस्थित होते. सभेचा प्रारंभ राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाला. शक्ती महिला ग्रामसंघाच्या सीआरपी मीना काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, ग्रामसंघाने ३६० महिलांना संघटित केले असून, अधिक महिलांना बचत गट स्थापन्यासाठी प्रोत्साहन देण्याचा मानस आहे. अर्जुन सोनवणे यांनी सांगितले की, बचत गटांच्या सक्षमीकरणामुळे सावकारी थांबली असून, महिला स्वावलंबी होत आहेत. त्यांनी नियमित बैठका, आरोग्य शिबिरे आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच, मीना काळे यांनी ३६० महिलांना संघटित करण्याच्या कार्याचे कौतुक केले. युवा उद्योजक बाळासाहेब मारकळी यांनी कर्जाची वेळेवर परतफेड करून बचत गटाची प्रतिमा उंचावण्याचे आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, बचत गटांना आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. सभेला शक्ती महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा स्वाती परदेशी, सचिव संध्या कुटे, कोषाध्यक्ष मनिषा सुरोशे, वनिता बोर्डे यांच्यासह कस्तुरी, सक्षम, मोहिनीराज, दुर्गा, अंबिका, वैष्णवी, धनश्री, धाडसी, स्वामी समर्थ, कृष्णा बचत गटांच्या महिला पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वाती परदेशी यांनी सूत्रसंचालन केले, तर मीना काळे यांनी आभार मानले.