Newasa News : सौर पंपाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला नेवासा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेवासा : अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळपूर (नेवासा) येथील शेतकऱ्यांना सौर पंपाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या संदीप दिलीप बोडके याला नेवासा आणि राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. या महाठगाने स्वतःला “संदीप बोडके” म्हणवून शेतकऱ्यांना फोनवरून संपर्क साधत, सौर पंपाचा अर्ज मंजूर झाल्याचे सांगून अनामत रक्कम पाठवण्यास सांगितले आणि फसवणूक केली.
प्रकाश पांडुरंग ढोकणे (रा. गोपाळपूर, ता. नेवासा) यांना 18 एप्रिल 2025 रोजी संदीप बोडके याने फोन करून सौर पंपासाठी अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. “आज अनामत रक्कम पाठवा, उद्या सौर पंप बसवू,” अशी बतावणी करत त्याने 3,400 रुपये फोन-पेवर मागितले. सुरुवातीला ढोकणे यांनी प्रतिसाद दिला नाही, परंतु सततच्या फोनमुळे त्यांनी ही रक्कम पाठवली. मात्र, नंतर बोडकेने फोन उचलणे बंद केले. ढोकणे यांना फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी तपास केला असता, संदीप गव्हाणे (रा. म्हसले), बाबा घुले (रा. तरवडी) आणि शरद गायकवाड (रा. वाकडी) यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे समोर आले.
पोलिस कारवाई आणि आवाहन
प्रकाश ढोकणे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संदीप बोडके (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. राहुरी तालुक्यातही अशाच प्रकारच्या फसवणुकीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नेवासा आणि राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बोडकेला अटक केली. यापूर्वीही त्याच्यावर दरोड्याची तयारीसारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी अशा फसवणुकीचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शहाजी आंधळे करत आहेत.





