Newasa News : नेवासात ॲड. संजय सुखदान यांच्या समर्थनार्थ व्यापारी, सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांचा मोर्चा

नेवासा : नेवासा येथील व्यापारी कमिटीचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावरील खोट्या गुन्ह्यातील नाव वगळण्याची मागणी घेऊन सोमवारी (दि. ११ ऑगस्ट २०२५) नेवासा येथील व्यापारी, सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येत नेवासा पोलीस स्टेशनला निवेदन दिले. या मागणीसाठी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांमुळे पोलीस स्टेशन परिसराला मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून थोडा वेळ दुकाने बंद ठेवली.
निवेदन देण्यासाठी नेवासा येथील पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय नागरिक एकत्र जमले. यामध्ये व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले. ॲड. संजय सुखदान यांच्यासह सर्वांनी नेवासा शहरातील मुख्य पेठेतून पोलीस स्टेशनकडे कूच केले. या वेळी रस्त्यावर अनेक नागरिक सहभागी होत गेले, ज्यामुळे गर्दी वाढत गेली आणि सुखदान यांचे हितचिंतक आणि सर्वसामान्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी नेवासा व्यापारी कमिटीच्या वतीने कुणाल मांडण यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी ॲड. संजय सुखदान यांचे लढवय्या नेतृत्व आणि गोरगरीबांना दिलेल्या आर्थिक व सामाजिक मदतीचा उल्लेख केला. विशेषत: अतिक्रमणाच्या काळात व्यापारी वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी सुखदान यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.
समर्पण फाऊंडेशन, नेवासा व्यापारी कमिटी, नेवासा प्रेस क्लब, नेवासा वकील संघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), शिवसेना (उबाठा गट) यांच्यासह विविध संघटनांनी निवेदन देऊन ॲड. सुखदान यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी समर्पण फाऊंडेशनचे डॉ. करणसिंह घुले, शिवसेना (उबाठा गट) चे बालेंद्र पोतदार, माजी नगराध्यक्ष सतीश पिंपळे, महेश मापारी, स्वप्नील मापारी, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष संदीप आलवणे, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस संजय बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते इम्रान दारूवाले, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, वंचित बहुजन आघाडीचे विजय गायकवाड, नेवासा प्रेस क्लबचे अशोक डहाळे आणि सुधीर चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
उपस्थितांनी आपल्या भाषणांतून ॲड. सुखदान यांचे सामान्य माणसासाठी लढणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. त्यांच्यावरील खोटा गुन्हा आकसबुद्धीने दाखल झाल्याचा आरोप करत, तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली. अनेकांनी चेतावणी दिली की, जर अशा लढवय्या व्यक्तिमत्त्वावर अन्याय झाला, तर व्यापारी, नागरिक आणि सर्वपक्षीय संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील. निवेदन नेवासा पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी “संजू नाना तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देण्यात आल्या.
खोटा गुन्हा आकसबुद्धीने दाखल – ॲड. संजय सुखदान
ॲड. संजय सुखदान यांनी यावेळी व्यक्त केले की, हा खोटा गुन्हा माजी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आकस आणि सूडबुद्धीने दाखल केला आहे. “आम्ही नेहमी अन्यायाविरुद्ध लढलो आहोत. आज शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी आलो आहोत, अन्यथा हजारोंच्या संख्येने गर्दी झाली असती. जाधव यांनी गोड बोलून मागून बोचकारा केला,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.





