Newasa News: नेवासा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चक्क एका मृत महिलेच्या जागी दुसरीच महिला उभी करून बनावट खरेदीखत नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेची पावणेदोन एकर जमीन परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी नेवासा पोलिसांनी जमीन विकणारी महिला, खरेदीदार तीन महिला आणि दोन साक्षीदार अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नेमकी घटना काय? संजय रावसाहेब पटारे उर्फ पठाडे (वय ३७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्र. ५९१०/२०२४ ची नोंदणी करण्यात आली. या दस्तामध्ये मयत महिला चंद्रभागा विनायक पटारे उर्फ पठाडे यांच्या मालकीची शेत गट नं. ८६ मधील पाऊणे दोन एकर (०.७२ आर) जमीन होती. आरोपी कांताबाई विनायक पटारे उर्फ पठाडे हिने स्वतः चंद्रभागा पटारे असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे सादर केली आणि या जमिनीची परस्पर विक्री केली. या फसवणुकीत तिला कुटुंबातील सदस्य आणि साक्षीदारांनी साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यांच्यावर झाला गुन्हा दाखल – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी खालील सहा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कांताबाई विनायक पटारे उर्फ पठाडे (बनावट विक्रेता), बाबासाहेब विनायक पटारे उर्फ पठाडे, चंद्रभान विनायक पटारे उर्फ पठाडे (तिघेही रा. धामोरी, ता. नेवासा), यशोदा भाऊसाहेब शेळके (रा. आरडगाव, ता. राहुरी) , हिराबाई राम वाघ (रा. नारायणवाडी, ता. नेवासा), कमलबाई विश्वनाथ म्हस्के (रा. जेऊर हैबती) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३२९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (४), ३३६ (३), ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष मालक हजर आहे की नाही, याची खातरजमा न करताच दस्त नोंदणी झाल्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.