Newasa News : सुलतानपुरात कृषी दिनानिमित्त शेतकरी चर्चासत्र व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन

नेवासा : सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी सुलतानपुर येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शेतकरी चर्चासत्र व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. शेतकरी संभाजी शहादेव खाटीक यांच्या डाळींब व पपई बागेत झालेल्या या कार्यक्रमात डाळींब, पपई आणि ऊस पिकांवरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आले.
प्रा. डॉ. अतुल दरंदले यांनी प्रास्ताविकात कृषी महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली, ज्यात अत्याधुनिक माती-पाणी तपासणी प्रयोगशाळा, जैविक खते, गांडूळ खत निर्मिती आणि शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे. उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे यांनी शेतीला उद्योग म्हणून पाहण्याचा सल्ला देत, शेतमाल विक्री, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत शेतीसाठी जिओमेट्री अभ्यासाचे महत्त्व विशद केले. पीक संरक्षण तज्ज्ञ प्रा. नरेंद्र दहातोंडे आणि प्रा. श्रीकृष्ण हुरुळे यांनी डाळींब, पपई, ऊस पिकांवरील किडी व रोग ओळख, कीटकनाशकांचा सुज्ञ वापर, जैविक व रासायनिक उपाय, सापळे आणि जैविक खतांचा प्रभावी वापर यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषिदूत वरुण गारुळे, निखिल दिघे, आदित्य लोंढे-पाटील, ओंकार कामठे, रुपेश कदम आणि युवराज हाके यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य सुनील बोरुडे, समन्वयक डॉ. अतुल दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. सुलतानपुरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रश्न विचारून संवाद साधला आणि आयोजकांचे आभार मानले. शेतकऱ्यांनी भविष्यात अशा चर्चासत्रांची गरज व्यक्त केली, हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.





