Newasa News : सौंदाळा (ता. नेवासे) या गावातील नागरिकांनी जाती-भेदभावाला ठामपणे मुठमाती देत सामाजिक समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामसभेत रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करून आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावाने स्वतःला “जातमुक्त गाव” म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे. ही माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली. ठरावाचा मुख्य उद्देश देश आणि महाराष्ट्रात जातींमुळे निर्माण होणारे तणाव, शांतताभंग, विनाकारण संघर्ष आणि मानवाधिकारांचे उल्लंघन कमी व्हावे, हा या ठरावाचा मुख्य हेतू आहे. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा हक्क दिला असला तरी प्रत्यक्षात जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता अजूनही कायम आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ अंतर्गत ग्रामसभेला सामाजिक, शैक्षणिक आणि नैतिक विकासासंबंधी ठराव घेण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून सौंदाळा गावाने सामाजिक एकात्मता आणि समतेची पायाभरणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामसभेत एकमताने मंजूर झालेला ठराव – मौजे सौंदाळा गावात जात, पंथ, धर्म, वंश यांच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही. – गावातील सर्व नागरिक समान आहेत आणि “माझी जात – मानव” ही भावना सर्वांनी स्वीकारली आहे. – सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम, विवाह, सण-उत्सव इत्यादींमध्ये जातीभेद पूर्णपणे बंद राहील. – गावात कोणतीही जातनिहाय प्रथा, भेदभाव, बहिष्कार, अस्पृश्यता किंवा सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा/ग्रामपंचायत तत्काळ कारवाई करेल. – सौंदाळा गाव “जातमुक्त गाव” म्हणून घोषित करण्यात येत आहे. – हा ठराव शासन आणि संबंधित विभागांकडे नोंदणीसाठी पाठवण्यात यावा. – सर्व सार्वजनिक ठिकाणे (पाणीपुरवठा, मंदिरे, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय इ.) सर्वांसाठी समान हक्काने खुली राहतील. – जातीय सलोखा, समता आणि बंधुतेबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील. – गाव “जातमुक्त गाव” म्हणून अधिकृतपणे घोषित करून त्यासंदर्भातील फलक लावण्यात येईल. – गावातील कोणीही सोशल मीडियावर जाती-भेदभावाबाबत मेसेज करणार नाही किंवा करू देणार नाही. – शासनाच्या समता आणि सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. ठरावाची प्रेरणा आणि नेतृत्व हा संकल्पना आणि प्रेरणा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाली. ग्रामसभेने त्यांचे विशेष आभार मानले. ठरावाची सूचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडली तर अनुमोदन बाबासाहेब बोधक यांनी दिले. ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. उपस्थित प्रमुख व्यक्ती या ऐतिहासिक ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा पिसोटे, उपसरपंच भिवसेन गरड, गणेश आरगडे, हरिभाऊ आरगडे, बाळासाहेब बोधक, बाबासाहेब बोधक, अमीनभाई सय्यद, छगन सय्यद, सचिन आरगडे, कृष्णा चामुटे, गणेश महाराज आरगडे, हरीश बोधक, बाबासाहेब आरगडे, भारत तारकस, सोमनाथ आरगडे, बाळासाहेब आरगडे, श्रद्धा आरगडे, राणी आरगडे, मनीषा गरड, नंदा आढागळे, कावेरी आढागळे आदी उपस्थित होते. सौंदाळा गावाने घेतलेला हा निर्णय ग्रामपातळीवर सामाजिक क्रांतीचा एक उत्तम आदर्श ठरू शकतो. यापुढे गावात जातीभेद नसून फक्त मानवता आणि समानता यांचाच विजय असावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.