Newasa News : नेवासा येथील 4 दिवसीय शांती महोत्सव उत्साहात संपन्न

नेवासा : नेवासा तालुका पास्टर असोसिएशनतर्फे नेवासा येथील मराठा बोर्डिंग प्रांगणात आयोजित 4 दिवसीय शांती महोत्सव 1 जून रोजी रात्री उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भयमुक्त आणि आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना आणि देवावरील भक्तीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन जिल्हा पास्टर असोसिएशनचे अध्यक्ष बिशप शमुवेल भिंगारदिवे यांनी केले.
29 मे ते 1 जून या कालावधीत दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. नेवासा तालुका पास्टर असोसिएशनचे अध्यक्ष पास्टर प्रकाश चक्रनारायन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले. पुणे येथील व्हाईस ऑफ जीजस मिनिस्ट्रीचे संदेष्टे रेव्हरंट जोसेफ साळवे, सोनाली साळवे, याव्हे शाम्मा ईव्हेंजेलिकल चर्चचे रेव्हरंट नरेंद्र गायकवाड आणि सारसनगर येथील स्पिरिचल फेलोशिप चर्चचे रेव्हरंट विकास दास यांनी प्रेरणादायी संदेश आणि प्रार्थनेद्वारे भाविकांना शांतीचा संदेश दिला.
या प्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. धर्मगुरूंनी त्यांच्या हातून तालुक्याच्या विकासासाठी चांगली कामे व्हावीत यासाठी आशीर्वाद दिले. महोत्सवात आत्मिक गीते, आजारी लोकांसाठी प्रार्थना, अद्भुत भविष्यवाणी आणि आरोग्य दानाच्या प्रार्थनांनी भाविकांचे मनोबल उंचावले. पुणे येथील आराधक अमित घाटगे आणि घोडेगाव येथील पास्टर संदेश पैलवान यांच्या टीमने स्तुती आराधनेसाठी विशेष योगदान दिले.
या महोत्सवाला नेवासा तालुक्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी हजेरी लावली. आयोजकांनी प्रमुख अतिथी, धर्मगुरू आणि पास्टर यांचे पुष्पगुच्छ आणि फेटा देऊन स्वागत केले. यावेळी बिशप शमुवेल भिंगारदिवे, अंकुर नरोला, जितेंद्र गौरव मसी, पास्टर सारंग पवार, फादर दिलीप जाधव, मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील, नगरसेवक अंबादास इरले, प्रदिपभाऊ सरोदे, कमलेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पास्टर शाहरुख पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.अवकाळी पावसाच्या भीतीने सर्वांना काळजी होती, मात्र प्रार्थनेच्या श्रद्धेमुळे परमेश्वराने पावसाला दूर ठेवून हा महोत्सव यशस्वी केला, असे आयोजक पास्टर प्रकाश चक्रनारायन यांनी सांगितले.





