नेवासा : नेवासा तालुक्यातील ‘भू लोकीचा स्वर्ग’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरुदेव दत्त पीठ, देवगड येथे बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रय, कार्तिक स्वामी आणि श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांचे दर्शन घेतले. विशेषतः महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. पहाटेच्या अभिषेकापासून महाआरतीपर्यंत भक्तिमय वातावरण पहाटेच्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोषात पीठाचे प्रमुख राष्ट्रसंत गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी महाराज आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला. दुपारी १२ वाजता जयघोष व घंटानादासह महाआरती पार पडली. यावेळी भाविकांनी हातात मोरपीस हलवत दत्तात्रय, कार्तिक स्वामी व किसनगिरी बाबांचा नामघोष केला. गुरुवर्यांची प्रार्थना: बलशाही भारतासाठी राष्ट्रीय ऐक्य महाआरती प्रसंगी बोलताना श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले,”कार्तिक स्वामींच्या उपासनेने साहस, धाडस, शक्ती, युक्ती व बुद्धी प्राप्त होते. ही सर्वांना प्राप्त होवो. देशवासीयांमध्ये एकोपा निर्माण होऊन त्यातून बलशाही भारत उभा राहो. राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत व्हावे, ही प्रार्थना!” प्रवरा घाटावर सुवासिनींची दिपोत्सवाची रांग पौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनींनी त्रिपुरारी वाती जाळून विधीवत पूजन केले. प्रवरा नदीच्या घाटावर गंगास्नान करून प्रवरामाईला दिवे अर्पण केले. घाटावर महिला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. अनेकांनी कार्तिक स्वामींना प्रिय असलेला मोरपीस दर्शन घेऊन अर्पण केला. यात्रेचे स्वरूप, महाप्रसाद वाटप मंदिर प्रांगणात विविध स्टॉल्स लावल्याने उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.गंगापूर तालुक्यातील कनकोरी, गळनिंब, जामगाव ग्रामस्थांनी महाप्रसादाचे वाटप केले. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. देवगड भक्त मंडळाच्या सेवेकऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा दिली. मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमास आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन प्रभाकरराव शिंदे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह अनेक संत-महाराज, सरपंच, गायक-वादक आणि संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो भाविक उपस्थित होते. शेवटचा शुभाशीर्वाद सर्व भाविकांना महंत श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी सुसंवाद साधत शुभाशीर्वाद दिला.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांनी देवगड दत्तपीठाला भक्तिमय वातावरणात न्हाऊन टाकले.