संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीत असलेल्या नेवासे (अहिल्यानगर जिल्हा) येथील नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीने राज्यभरात एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी मुख्य स्पर्धा महायुतीचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले (शिवसेना – शिंदे गट) आणि क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांच्यात होती. यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, आम आदमी पार्टी तसेच काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले होते. महाराष्ट्रातील इतर निवडणुकांप्रमाणे येथेही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता होती. मात्र, या धार्मिक नगरीतील सर्व उमेदवारांनी वैयक्तिक टिका टाळून केवळ विकासाच्या मुद्द्यांवर आणि आपल्या राजकीय रणनीतीवर भर दिला. प्रतिस्पर्धी उमेदवारांवर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप न करता, जाहीर सभांमध्येही पक्षीय पातळीवर मर्यादित टीका केली गेली. उमेदवारांनी मतदारांना विकासाच्या आश्वासनांवर विश्वास टाकला आणि थेट जनमत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या निवडणुकीत प्रचारादरम्यान एकमेकांवर ‘राजकीय धुलवड’ उडाली नाही, तर सुसंस्कृतपणे स्पर्धा केली गेली. यामुळे नेवासेकर मतदारांसह हार-जीत मान्य करणाऱ्या उमेदवारांचेही कौतुक होत आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळातून या निवडणुकीला ‘सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श’ म्हणून स्तुती होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीतून राज्याला हा सकारात्मक संदेश दिल्याबद्दल नेवासे नगरीचा गौरव केला जात आहे. ही निवडणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली, ज्यामुळे स्थानिक पातळीवर राजकारणाची नवी व्याख्या निर्माण झाली आहे. अशा सुसंस्कृत स्पर्धेमुळे नेवासे राज्याच्या राजकीय नकाशावर एक आदर्श उदाहरण म्हणून नजरेत भरले आहे.