नेवासा : (राजेंद्र वाघमारे) – पहिल्यांदा जोरदार प्रचाराला सुरुवात झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीला अचानक निवडणूक आयोगाने ब्रेक लावल्याने उमेदवारांसह मतदारांचाही चांगलाच हिरमोड झाला होता. आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यानंतर अवघ्या दहा-बारा दिवसांतच उमेदवार पुन्हा रिंगणात उतरले असून, खिशाला कात्री मारूनही प्रचाराचा धुराळा उडवण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक पुढे गेल्याने काही उमेदवारांनी खर्च थांबवला होता. काहीजण तर नॉट रिचेबल होऊन गायब झाले होते. मात्र आता पुन्हा तेच चेहरे मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. हवशी-नवशी कार्यकर्त्यांना पुन्हा खर्च-पाणी सुरू झाल्याने गुलाबी थंडीतही काही नाईन्टी बहाद्दर भरचौकात बागडू लागले आहेत. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी आता नमस्कार-चमत्काराला वेग दिला आहे. मतदारांची मनधरणी करण्यासाठी घरट्यागणिक भेटी, चहा-पाण्याच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. निवडणूक आखाड्यात पुन्हा एकदा रंग भरण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. पहिल्या टप्प्यात चांगलीच रंगत आलेली ही निवडणूक आता दुसऱ्या टप्प्यात अधिक धुमधडाक्यात येणार हे मात्र निश्चित!