नेवासा: पाचेगांव शिवारात खून; पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केली घटनास्थळाची पाहणी

नेवासा (प्रतिनिधी) – पाचेगांव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा अज्ञात आरोपींनी शुक्रवार (दि.१६) रोजी खून केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस या अनोळखी इसमाच्या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या खुन्याच्या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
शनिवारी दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीसांना तपासाच्या दृष्टीने महत्वाच्या सुचना दिल्या. त्यामुळे नेवासा पोलीस अनोळखी मृतकाची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन खुनाच्या गुन्ह्याला नक्कीच वाचा फोडू शकणार असल्याचा विश्वास नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक जाधव यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला आहे.
अनोळखी इसमाच्या अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी नेवासा पोलीसांचे पाच विशेष पथके तयार करण्यात आलेली असून जिल्हा पोलीस अधिक्षक ओला यांनी तपासाच्या दृष्टिकोनातून नेवासा पोलीस निरीक्षक जाधव आणि पोलीस सहकाऱ्यांना काही विशेष सुचना दिल्यामुळे या तपासाचा धागादौरा लागण्यास मोठी मदत होणार असून लवकरच पोलीस खुन्याच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहचू शकतील? असा आशावाद पोलीसांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक ओला यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी पोलीस निरिक्षक जाधव पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील,पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर,आप्पा तांबे,भारत बोडके,अवि वैद्य उपस्थित होते दरम्यान मृतकाची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक उज्जैन येथे मागील तीन दिवसापासून तळ ठोकून असल्याची माहिती यावेळी पोलीस सूत्रांनी बोलताना दिली.
सदर खून अद्याप उघडकिस न आल्याने खूनाचा गुन्हा मोठा आव्हान ठरत असल्यामुळे या गुन्ह्याच्या घटनास्थळी शनिवारी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपास पथकासह धो – धो पडत्या पावसात भेट दिली. घटनास्थळाची भौगोलिक पार्श्वभूमी येणारे व जाणारे रस्ते आणि आजपर्यंत नेवासा पोलीसांनी केलेला तपास जाणून घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासी अधिकारी व नेवासा पोलिसांना काही महत्त्वाच्या सूचना यावेळी दिल्या आहेत.या सूचना आणि टिप्सच्या आधारे अनोळखी मृतक याची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन खुनाच्या गुन्ह्याला नक्कीच वाचा फोडू असा विश्वास नेवासा पोलिसांनी व्यक्त केला आहे.





