Newasa : मुळा व ज्ञानेश्वर कारखाना निवडणूक: आमदार लंघे-पाटलांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी
Newasa :

Newasa : नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर आणि मुळा सहकारी साखर कारखान्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही कारखान्यांविरोधातील विविध गटांतील सभासद पहिल्यांदाच एकत्र आल्याचा दावा आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी केला.
आमदार लंघे-पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी विरोधी सभासदांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीस भाजपा, शिवसेना, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते. “प्रस्थापित व्यवस्थापनाविरोधात उभे राहणारे सर्वजण आपले मित्र असून यावेळी कोणतीही तडजोड होणार नाही,” असा इशारा लंघे-पाटील यांनी दिला.
पंचगंगा शुगरचे प्रभाकर (काका) शिंदे यांनीही दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. “सभासदांनी घाबरण्याची गरज नाही. सभासदांचा ऊस नेण्याची जबाबदारी आमची राहील. योग्य भाव देऊन ऊस घेतला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
“कारखाना चालवणे म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. काटकसर आणि पारदर्शक कारभार केल्यास कोणताही कारखाना सक्षमपणे चालू शकतो,” असे सांगत त्यांनी विद्यमान व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष टीका केली. दोन्ही कारखान्यांवर ५०० ते ६०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
सभासदांचा विश्वास संपादन करण्यात दोन्ही कारखाने अपयशी ठरल्याचा आरोप करताना, “आजही सभासदांनी लावलेला ऊस कारखाना नेईल की नाही, याची शाश्वती नाही. ही बाब लाजिरवाणी आहे,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.
बैठकीस शंकराव लोखंडे, किसनराव गडाख, अंकुश काळे, डॉ. करणसिंह घुले, भाऊसाहेब वाघ, किरण जाधव आदी उपस्थित होते.





