Newasa : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
Newasa :

Newasa : भेंडे (ता. नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. कारखान्याच्या सर्व २१ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने कारखाना परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे मार्गदर्शक डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि युवानेते क्षितिज घुले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. विरोधकांनीही कारखान्याच्या हितासाठी निवडणुकीतून माघार घेतल्याने घुले बंधूंचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व आणि संघटन कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शेवगाव, शहरटाकळी, कुकाणा, नेवासा, वडाळा व ढोरजळगाव गटांसह महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, इतर मागास प्रवर्ग तसेच उत्पादक व बिगर उत्पादक संस्थांच्या मतदारसंघांतील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
कारखान्याच्या विकासासाठी सर्व घटकांनी दाखविलेल्या एकजुटीचे हे प्रतीक असल्याची भावना सभासद व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बिनविरोध निवडणुकीमुळे विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास घुले बंधूंनी व्यक्त केला.
दरम्यान, स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी उभारलेल्या सहकार चळवळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला मोठी चालना मिळाली. त्यांची परंपरा कायम राखत कारखान्याच्या प्रगतीसाठी राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका सर्व घटकांनी स्वीकारल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली, अशी प्रतिक्रिया सहकार क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.





