Newasa : नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे उष्मघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. पोखर्डी (ता. जि. अहिल्यानगर) येथील गुलाब चिमाजी गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तालुक्यातील उष्मघाताचा हा पहिला बळी ठरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगाव देवी परिसरात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती रुग्णवाहिका चालक विकास निपुंगे यांना सायंकाळी मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, तालुक्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचल्याने नागरिक, कामगार व मजुरांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे.