Newasa: खरीप हंगाम २०२५-२६ मधील अतिवृष्टीमुळे कापूस, तूर आणि सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतरही पीकविमा भरपाई रखडल्याने नेवासा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाच्या अनुदानासोबतच प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असताना, रब्बी हंगाम संपत आला तरीही शेतकऱ्यांच्या पदरात एकही रुपया पडलेला नाही. यामुळे विमा कंपन्या आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी नोंदवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संताप अधिक वाढला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने शंभर टक्के भरपाईचे आदेश दिल्याचा दावा केला असला तरी ते प्रत्यक्षात कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सौंदाळा येथील शेतकरी कमलेश नवले यांनी शासनाला निवेदन देत तात्काळ पिकविमा रक्कम वितरित करण्याची मागणी केली आहे. येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास नेवासा कृषी कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित विभागांना पाठवण्यात आल्या असून प्रशासनाच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.