नेवासा : दैनिक ‘प्रभात’ने विश्वविंड ते भेंडा या 220 के.व्ही. अतिउच्च दाब विद्युत मनोरे उभारणी कामाला असलेल्या शेतकऱ्यांच्या असलेल्या विरोधाबाबत बातमी दिली होती. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या तीव्र विरोधाबाबत ‘प्रभात’ने आपला निर्भिड बाणा कायम ठेवत कणखर भूमिका घेतली. प्रभातने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची भक्कमपणे बाजू मांडून वाचा फोडण्याची सडेतोड भूमिका घेतल्यामुळे पोलिस प्रशासन चांगलेच हादरुन गेले आहे.
दैनिक प्रभात’च्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तमालिकेचा धसका प्रशासनाने घेवून कागदोपत्री ‘खेळ’ रंगवण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्यावतीने प्रशासनाच्या झालेल्या चुका आणि भूमिकेबाबत छञपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध विधिज्ञ आणि शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजीत काळे यांनी दैनिक प्रभात’च्या वृत्ताचे कौतुक केले. शेतकऱ्यांची बाजू घेत पोलीस कारवाईबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दैनिक प्रभात’शी बोलताना दिली.
विश्वविंड ते भेंडा या अतिउच्च दाब वीज वाहिनीच्या मनोरे उभारणी कामाला विरोध करणारे सौंदाळा (ता.नेवासा) येथील शेतकरी संजय ठुबे यांच्या आंदोलनाची भक्कम बाजू दैनिक प्रभात’ने मांडली. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा ‘प्रभात’ने मांडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रशासन आणि राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रसिद्ध विधिज्ञ अजीत काळे यांनी नेवाशात नुकतीच एक बैठक बोलवली होती. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा, पोलिसांची भूमिका आणि झालेल्या कारवाईबाबत बैठकीत मंथन करण्यात आले.
या बैठकीत बोलताना सौंदाळा येथील शेतकरी संजय ठुबे म्हणाले की, मी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा लढा उभारत असताना नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनंजय जाधव यांनी नोटीस देऊन माझा लोकशाही मार्गाने सुरु असलेला आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला.
नेवासा पोलिसांनी नोटीस दिलेली असताना ‘त्या’ नोटीसला उत्तर देण्यासाठी संजय ठुबे हे पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांनी ठुबे यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले. त्यांनी शेतीतून टॉवर लाईन जाण्यासाठी बंद पडलेले हे काम पुन्हा सुरु करण्यासाठी संजय ठुबे यांच्या समोरच पोलीस ठाण्यात निरिक्षक जाधव यांनी महापारेषाण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत काम चालू केले.
ठुबे यांना अटक करुन गुरुवार (दि.१३) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता न्यायालयाचे कामकाज बंद होण्याच्या वेळेत त्यांना नेवासा न्यायालयासमोर हजर करावयाचे आहे? असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात मात्र हजर न करता पो. नि. धनंजय जाधव यांनी ठुबे यांना न्यायालयात विनाकारण बसवून ठेवल्याची माहिती स्वतः ठुबे यांनी दैनिक प्रभात’शी बोलताना दिली.
न्यायालयात हजर न करता विनाकारण बसवून ठेवून पुन्हा परत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे अटक करून जेलमध्ये डांबून ठेवले. त्यावेळी पोलीस कारवाईच्या विरोधात जेलमध्ये आंदोलन चालू ठेवून अन्नत्याग केल्यामुळे ठुबे यांची प्रकृती खालावली होती.तसेच, पोलिसांच्या भूमिकेबाबत ते पुर्णपणे हतबल झालेले होते. पोलिसांनी दुपारनंतर त्यांना जेलच्या बाहेर काढले आणि दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेवून जाण्यात आले.
सरकारी दवाखान्याजवळ पोलीस वाहन आलेले असताना पुन्हा पो. नि. धनंजय जाधव यांनी काही लोकांसमोर या प्रकरणातून माघार घ्यावी म्हणून प्रचंड दबाव आणला. ते खाकीचा धाक दाखवत होते अशी माहिती संजय ठुबे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना दिली.
एकीकडे संजय ठुबे यांची प्रकृती बिघडलेली असताना दुसरीकडे पो. नि. धनंजय जाधव हे त्यांना या प्रकरणातून माघार घेण्यासाठी वकिली करत होते आणि उशिरा दुपारनंतर त्यांना दवाखान्यात नेले. दवाखान्यात औषधोपचार केल्यानंतर त्यांना थेट परत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्याकडे एका खाजगी वाहनाद्वारे घेवून जावून पुन्हा सोडून देण्यात आले. मग जर न्यायालयात हजर करायचे नव्हते तर विनाकारण न्यायालयात पोलीस कोणाच्या इशाऱ्यावर घेवून गेले, असा संतप्त सवाल यावेळी ठुबे यांनी प्रभात’शी बोलताना केला.
पोलीस निरिक्षक जाधव यांनी माझ्या कुटुंबाला त्रास देऊन छळ केलेला आहे. माझ्या घरातील सदस्यांना मारहाणही करून ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकले. याबाबत कायदेशीर सनदशील मार्गाने पाठपुरावा करुन आपण लढा देणार असल्याची माहिती संजय ठुबे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना दिली.