PAK Vs NZ : न्यूझीलंडचा पाकिस्तानवर 60 धावांनी दणदणीत विजय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कराचीमध्ये पार पडला. या लढतीत पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात थोडी अडखळत झाली. सलामीवीर कॉन्वे आणि त्यानंतर अनुभवी केन विलियमसन हे दोघे लवकर बाद झाले. त्यामुळे त्यांची अवस्था 2 बाद 40 अशी झाली होती.
यानंतर विल यंग आणि लॅथम यांनी शतकी खेळी करून न्यूझीलंडला 300च्या पुढे नेले. 40 षटकात न्यूझीलंडने 4 बाद 207 धावा केल्या होत्या. अखेरच्या 10 षटकात ते 80 ते 90 धावा करतील असे वाटत होते. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली आणि ३०० धावांचा टप्पा पार केला. न्यूझीलंडकडून विल यंगने 107 आणि टॉम लॅथमने 118 धावांची खेळी केली. तर ग्लेन फिलिप्सने 39 चेंडूत 61 धावा केल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पहिले शतक झळकावण्याचा मान विल यंगला मिळाला.एकच डावात दोघांनी शतक करण्याची स्पर्धेच्या इतिहासात ही पाचवी अशी वेळ आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या 60 चेंडूत 113 धावा केल्या. न्यूझीलंडने 50 षटकात 5 बाद 320 धावा केल्या. हरिस रौफने 10 ओव्हरमध्ये 83 धावा देऊन २ विकेट घेतल्या. तर शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी अनुक्रमे 68 आणि 63 धावा दिल्या.
यानंतर प्रत्युत्तरादाखल आलेल्या पाकिस्तानची देखील सुरुवात थोडी अडखळत झाली. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील हे लवकर बाद झाले. यानंतर बाबर आझम, फाखर जमान, सलमान आगा आणि कुशदील शहा यांनी प्रतिकार केला पण ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. यामध्ये बाबरने ६४ तर कुशदीलने ६९ धावा केल्या. बाकी फलंदाजांना काही खास कामगिरी करता आलेली नाही. यामुळे न्यूझीलंडने पाकिस्तानवर ६० धावांनी विजय मिळवला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर विल्यम ओरोर्के, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर मॅट हेन्रीरे २ विकेट्स घेतल्या. तर ब्रेसवेल आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.





