Online Scam Safety Tips : नवीन वर्षाच्या निमित्ताने फिरायला जाण्याचा अथवा ऑनलाइन शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर नववर्षाच्या निमित्ताने ऑनलाइन माध्यमातून शॉपिंग करत असाल अथवा प्रवासासाठी तिकिट बुक करत असाल तर काळजी घ्यायला हवी. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून तुमची फसवणूक करू शकतात. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, त्याविषयी जाणून घेऊयात. बनावट लिंकवर क्लिक करणे टाळा नववर्षाच्या निमित्ताने ऑफर्स, गिफ्ट वाउचर, डिस्काउंटची माहिती देणारे अनेक मेसेज, ईमेल आपल्याला येत असतात. वस्तू स्वस्तात मिळत असल्याने आपण देखील अशा लिंकवर क्लिक करतो. या लिंकच्या माध्यमातून तुमची खासगी माहिती चोरीला जाऊ शकते. यामुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे कधीही अनोळखी नंबर अथवा ईमेलवरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. वेबसाइट तपासा मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्यांना नवनवीन वर्षाचे गिफ्ट देण्याचा तुम्ही नक्कीच विचार केला असेल. याशिवाय, सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचाही तुमचा प्लॅन असेल. मात्र, गिफ्ट खरेदीसाठी अथवा तिकीट बुक करण्यासाठी एखाद्या वेबसाइटला भेट देत असाल तर सावधगिरी बाळगा. खरेदी करण्यापूर्वी वस्तू आणि वेबसाइटचा रिव्ह्यू तपासा. अशी वेबसाइट बनावट असल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. बँकेच्या नावाखाली फसवणूक बँकेचे कर्मचारी अथवा उच्चपदावरील अधिकाऱ्यांच्या नावाने फोन येत असल्यास सावधगिरी बाळगावी. अनेकदा सायबर गुन्हेगार प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा वापर करून बँकेची माहिती जाणून घेतात. याशिवाय, डेबिट कार्ड व ओटीपीची माहिती विचारतात. अशा प्रकारची माहिती शेअर केल्यास तुमच्या बँकेतून पैसे काढून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे अशाप्रकारची फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची खासगी माहिती शेअर करू नये. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सोशल मीडिया अकाउंट, ईमेल आणि बँकिंग अॅप्सचा वापर करताना टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करायला हवा. तसेच, कोणत्याही अकाउंटचा वापर करताना योग्य पासवर्डचा वापर करावा. इतरांच्या लॅपटॉप व मोबाइलवर नेटबँकिंगचा वापर करू नये.