फेब्रुवारी अखेरपर्यंत कामे पूर्ण करणार
सुरक्षितता प्रमाणपत्र मिळताच पुणे मेट्रो नागरिकांसाठी खुली होणार
पुणे – गेली दहा वर्षे केवळ चर्चेत असलेली पुणे मेट्रो अखेर नवीन वर्षात पुणेकरांच्या सेवेत उतरणार आहे. या प्रकल्पासाठीच्या पहिल्या प्राधान्य मार्गावरील उर्वरित कामे फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत पूर्ण केली जाणार असून सुरक्षितता प्रमाणपत्र मिळताच पुणे मेट्रो नागरिकांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी जाहीर केले. यावेळी पुण्यात दाखल झालेल्या मेट्रो कोचला फुलांची आकर्षक सजावट केली होती.
पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि संत तुकारामनगर ते पिंपरी-चिंचवड या प्राधान्य मार्गांवर मेट्रो प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यातील पहिला मार्ग पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी नागपूरहून पुण्यात आणलेल्या मेट्रोच्या पहिल्या ट्रेनची विधिवत पूजा आणि त्याचे औपचारिक उद्घाटन दीक्षित यांच्या हस्ते झाले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे बांधकाम सुरू झाल्यापासून अवघ्या महिन्यांमध्ये मेट्रोची ट्रेन रुळांवर पोहोचली असून नव्या वर्षात पुणेकर मेट्रोतून निश्चित प्रवास करतील, अशी ग्वाही दीक्षित यांनी दिली. नागपूरहून निघालेली मेट्रोची दुसरी ट्रेनही पिंपरी मार्गासाठी वापरण्यात येणार आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये वनाज ते गरवारे कॉलेज मार्गासाठी आणखी दोन ट्रेन पुण्यात दाखल होणार असल्याचे दीक्षित यांनी यावेळी सांगितले.
कोच केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे
पुण्याच्या मेट्रोसाठी टिटागर्ह-फिरेमा कंपनीकडून कोच मिळण्यास 2021 मध्ये सुरुवात होणार असल्याने तोपर्यंत हेच कोच वापरण्यात येणार आहेत. हे कोच केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे असून पुणे मेट्रोसाठीचे कोच ऍल्युमिनियमपासून तयार केले जाणार असल्याने ते वजनाला हलके असतील. या नव्या अद्ययावत कोचमुळे ऊर्जा बचत होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.