प्रभात वृत्तसेवा पुणे – हिवाळ्यातील शेकोटीची ऊब आणि रंगलेल्या गप्पांच्या अनोख्या वातावरणात ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या (डीपीईएस) खराडी कॅम्पसमध्ये ‘लार्जेस्ट ऑडियन्स ॲंड कँम्पफायर स्टोरीटेलिंग’ या नव्या गिनिज विश्वविक्रमाची नोंद झाली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ किल्ल्यांना नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराय आणि संबंधित किल्ल्यांवर कथाकथन केले. या सत्राला तब्बल ४६२३ श्रोत्यांनी उपस्थित राहून विक्रम नोंदविला.या विक्रमाची पाहणी करण्यासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ अॅडज्युडिकेटर प्रवीण पटेल विशेष लंडनहून पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्या हस्ते डीपीईएसचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ढोले पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना मिळालेल्या जागतिक मान्यतेनंतर त्यांचे ऐतिहासिक महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी हा उपक्रम राबवला. कँम्पफायर स्टोरीटेलिंग ही संकल्पना गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय असून, या विश्वविक्रमामुळे शिवरायांचे पराक्रम आणि किल्ल्यांची अनोखी वास्तुशिल्प परंपरा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापकपणे पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले. अवघ्या एका वर्षात डीपीईएसचा हा तिसरा गिनिज विश्वविक्रम असून यापूर्वी कृत्रिम अवयव बसवण्याचा व गणेशोत्सवात सर्वाधिक नागरिकांनी एकत्रित आरतीचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.