मुंबई : स्वातंत्र्याशिवाय जीवन जगण्याचा विचार केला तरी भीती वाटते. आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा होता आणि त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दिवशी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं, म्हणून आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. देशभक्तीवर अनेक चित्रपट आणि गाणी बनली आहेत.
लोक सेवा संचार परिषदेने 33 वर्षांपूर्वी असंख्य मान्यवर कलाकारांना घेऊन तयार केलेला देशप्रेमावरचा व्हिडीओ “मिले सूर मेरा तुम्हारा…’ आजही आपल्या स्मरणात असेलच. पंडित भिमसेन जोशी, लता मंगेशकर, एसपी बालमुरलीकृष्णन यांच्यासह अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, कमल हासन, हेमा मालिनी, वैजयंती माला अशा असंख्य दिग्गजांनी अविस्मरणीय झालेला हा व्हिडीओ आजही राष्ट्रप्रेमाचे प्रतीक बनून राहिला आहे.
मुंबईतील अटलांटीस सोसायटीच्या सदस्यांनी याच “मिले सुर मेरा तुम्हारा…’ चा ऑडिओ ट्रॅक कायम ठेवून त्यावर भारतीय प्रांताप्रांतातील संस्कृती दर्शवणारा नवा व्हिडीओ युट्युबवर प्रसिद्ध केला आहे, “मिले सूर मेरा तुम्हारा – रिव्हिजिटेड’ या नावाने. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.
या व्हिडीओची संकल्पना आणि दिग्दर्शन प्राची भोबे आणि प्रिया रविशंकर यांचे असून संहितेच्या संकल्पनेसाठी अजय कुलकर्णी यांनीही मदत केली आहे. तसेच “ए मिनिस्ट्री ऑफ हॅपिनेस’ असे निर्माण करणाऱ्या संस्थेचे सार्थ नाव दिले आहे.
पहा हा व्हिडीओ आणि नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया…