वाघोलीत वीज बचतीचे नवे पाऊल

वाघोली – वाघोली येथील रोहन अभिलाषा ए क्लस्टरमध्ये १६० केव्ही पी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते झाले. ७९ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला २८ लाख रुपयांची सरकारी अनुदान मिळाले आहे. यामुळे दरमहा सुमारे ३ लाख रुपयांची वीज बिलात बचत होणार आहे. यावेळी चेअरमन राजेंद्र परभाणे, सेक्रेटरी योगेश गाडगे, खजिनदार दिलीप शिरसे, नीरज गोयल, आनंद भंडे, स्नेहा वाळुंज, गणेश कंद, शशांक गुप्ता, बसंत राज, दीपक सोनवणे, दिनेश गुळवे आदी उपस्थित होते.
दुसरीकडे, रोहन सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनेही २५ केव्ही पी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. हा प्रकल्प दरमहा ७५० युनिट्स वीज निर्मिती करतो, ज्यामुळे सुमारे ३०,००० रुपयांची बचत होते. ही बचत सोसायटीच्या देखभाल खर्चात कपात करण्यास मदत करेल. या प्रकल्पाचे उद्घाटनही रामभाऊ दाभाडे यांच्यासह अध्यक्ष विक्रांत राजपूत, उपाध्यक्ष नवीन नायडू, सचिव संदीप आमटे, खजिनदार लक्ष्मण शिरोळे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
“वाघोलीतील सोसायटींचा सौर ऊर्जा प्रकल्प हा पर्यावरणपूरक पुढाकार आहे. वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर असे उपक्रम वीज बचतीचा आदर्श ठरत आहेत. हे खरोखरच अभिमानास्पद आहे,” असे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.





