मुंबई : राज्यात झालेल्या बंडानंतर शिवसेनेचे चिन्ह नुकतेच गोठवले आहे. त्यानंतर आयोगाकडून दोन्ही गटांना नाव नाव आणि चिन्ह आज सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज दोन्ही गटाने पक्ष चिन्ह आणि नाव सादर केले खरे मात्र दोन्ही गटाचे चिन्ह हे सारखेच असल्याने आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडे चिन्हे आणि नावे सादर करण्याची शेवटची मुदत होती. त्याप्रमाणे दोन्ही गटांनी आपली चिन्हं आणि नावं सादर केली आहे. यामध्ये खूपच साम्य असल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही तीन चिन्हं सादर केली आहे. तर शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हं दिली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच दोघांची वेगळी चिन्हं आहेत.
चिन्हच नाही तर आता नावांमध्येही असंच साम्य आढळून आले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावं सांगितली होती. तर शिंदे गटही बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे गटाकडून पक्षासाठी आनंद दिघेंचे नाव वापरण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आता या साम्यामुळे दोन्ही गटात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.