New Rules September 2025: दरमहा प्रमाणे सप्टेंबर 2025 मध्येही अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. 1 सप्टेंबर 2025 पासून चांदीच्या हॉलमार्किंगपासून ते एसबीआय कार्डवरील वाढीव शुल्क, एलपीजीच्या किमती, एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क आणि फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) व्याजदरांमध्ये संभाव्य बदल यासारख्या नव्या तरतुदी लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट आणि दैनंदिन खर्चांवर होईल. चांदीच्या खरेदीवर नवे नियम – केंद्र सरकार आता सोन्याप्रमाणेच चांदीच्या खरेदी-विक्रीसाठी कठोर नियम लागू करणार आहे. चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची तयारी सुरू आहे. यामुळे चांदीच्या शुद्धतेत आणि किमतीत पारदर्शिता येणार आहे. यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांना विश्वासार्ह व्यवहार करता येतील. तज्ज्ञांच्या मते, या नियमांमुळे चांदीच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो. चांदीचे दागिने खरेदी किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांनी नव्या नियमांचा विचार करावा. एलपीजीच्या किमतींमध्ये बदल – प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 सप्टेंबर 2025 रोजी एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या आणि जागतिक बाजारपेठेच्या आधारावर या किमती ठरतात. गेल्या महिन्यात म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 33.50 रुपयांची कपात झाली होती, परंतु घरगुती रसोई गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर होत्या. यावेळी किमती वाढल्यास स्वयंपाकघराचे बजेट कोलमडू शकते. त्यामुळे खर्चाची आधीच योजना करणे गरजेचे आहे. जर किमती कमी झाल्या तर ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब ठरेल. सीएनजी आणि पीएनजीच्या किमती – तेल कंपन्या अनेकदा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये बदल करतात. मात्र, एप्रिलपासून यात कोणताही बदल झालेला नाही. शेवटचा बदल 9 एप्रिल रोजी झाला होता, जेव्हा मुंबईत सीएनजीची किंमत 79.50 रुपये प्रति किलोग्राम आणि पीएनजी 49 रुपये प्रति युनिट झाली होती. गेल्या सहा महिन्यांत ही चौथी वाढ होती. एसबीआय क्रेडिट कार्डधारकांसाठी नवे शुल्क – 1 सप्टेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना नव्या शुल्काचा सामना करावा लागणार आहे. बिल पेमेंट, इंधन खरेदी किंवा ऑनलाइन खरेदीवेळी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. ऑटो-डेबिट अयशस्वी झाल्यास 2 टक्के दंड आकारला जाईल, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरही जास्त शुल्क लागू होईल. रिवॉर्ड पॉइंट्सची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसबीआय कार्ड वापरणाऱ्यांनी खर्चाचे नियोजन आधीच करावे, जेणेकरून अनावश्यक दंड टाळता येईल. एफडी व्याजदरांमध्ये बदलाची शक्यता – बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरांमध्येही बदल होऊ शकतात. सध्या 6.5 ते 7.5 टक्के व्याज मिळत आहे, परंतु पुढील काळात हे दर कमी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एफडी करण्याचा विचार करत असाल, तर लवकर निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. एटीएममधून पैसे काढण्याचे नवे नियम – काही बँकांनी एटीएममधून पैसे काढण्यावर नवे शुल्क लागू करण्याची तयारी केली आहे. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. त्यामुळे रोख रक्कम काढण्याऐवजी डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे फायदेशीर ठरेल. या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे नव्या नियमांची माहिती घेऊन आपले बजेट आणि खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे.