ओमायक्रॉन चाचणीसाठी नवे किट येणार; अवघ्या अर्ध्या तासात समजणार अहवाल

पुणे – करोनाच्या “ओमायक्रॉन’ व्हेरिएंटची लागण झाल्याचे तपासण्यासाठी नवे किट येणार असून, अर्ध्या तासांत त्याचा अहवाल मिळू शकणार आहे. हे किट राज्यसरकार विकत घेणार असून, पुणे विभागालाही सुमारे 23 हजार किट उपलब्ध होणार आहेत.
“थर्मोफिशर’ कंपनीचे हे किट असून, त्याची किंमत प्रती किट 240 रुपये आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या स्वॅब नमुन्यांची या किटमध्ये तपासणी केली असता, “एस जीन’ आढळला नाही तर “ओमायक्रॉन’ची लागण झाली आहे असे समजले जाईल. आणि “एस जीन’ असेल तर तो “डेल्टा बाधित’ समजला जाणार आहे.
ही टेस्ट म्हणजे “आरटी-पीसीआर’ प्रमाणेच आहे, परंतु याला “स्पेसिफिक आरटी-पीसीआर’ टेस्ट म्हणता येईल, अशी माहिती पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.
सध्या कमी प्रमाणात हे किट मिळणार असले, तरी ज्या भागात ओमायक्रॉनचे बाधित (क्लस्टर) जास्त आढळतील तेथे याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे नेमका कधी, कुठे याचा वापर करणार याबाबत ओमायक्रॉन बाधितांची संख्या दुर्दैवाने वाढली तर त्या भागात करण्यात येणार आहे.
पुणे आणि कोल्हापूर सर्कल मिळून 23 हजार किट उपलब्ध होणार असून, त्यातील चार हजार किट पुण्यासाठी मिळणार असल्याचे, डॉ. देशमुख यांनी नमूद केले. येत्या आठ दिवसांमध्ये हे किट मिळतील, अशी शक्यता डॉ. देशमुख यांनी वर्तवली.

