Hitesh Mehta : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेत नुकताच गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडियाचे कोणतेही नियम आणि निकष पालन न करता नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केले. तसेच मोठ्या प्रमाणात व्याजदर लावल्याचे प्रकरण समोर आले.
न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आरोपी हितेश मेहताला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली. पोलिसांनी किल्ला कोर्टात हजर केलं असता, न्यायालयानं आरोपी हितेश मेहताला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात आरोपी हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दादर, माझगाव या शाखेमध्ये 122 कोटी रुपयाचा हितेश मेहता याने घोटाळा केल्याचे समोर आले. त्यामुळे या बँकेतील घोटाळा प्रकरणी धर्मेश पौनालाही 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अन्य कोणाचा सहभाग आहे का? किंवा आरोपी हितेश मेहता याच्यासोबत आणखी कुणाचे या घोटाळ्यात संबंध आहेत का? याचा पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.





