नव्या ‘हिरकणी’ला हायटेक साज; मोबाइल चार्जिंग, पॅनिक बटणापर्यंत मिळणार सर्व सुविधा

पुणे – एसटी महामंडळातील “हिरकणी’चा प्रवास आरमदायी आणि आनंदी, त्यामुळे सुरवातीपासून हिरकणी बसला प्रवासांची मोठी पसंती आहे. मात्र, आता ही हिरकणी बदलतेय. नवीन हिरकणी आणखीन सुसज्ज आणि हायटेक होत आहे. बसमधील माइकमधून सूचना देईपासून पॅनिक बटनपर्यंत सर्व सुविधा प्रवाशांना मिळणार असून, एअर सस्पेंन्शनमुळे प्रवासही सुखाचा होणार आहे.
हिरवी -पांढऱ्या रंगातील हिरकणी बस आता नव्या रूपात आणि रंगात येत आहे. बसचा रंग पांढरा व गुलाबी केला आहे. बसची आसनक्षमताही वाढविण्यात आलेली आहे. त्यामध्ये सध्या एसटी महामंडळाच्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत दोनशे हिरकणींची बांधणी सुरू असून, दोन महिन्यांत त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. तर काही बस या सेवेत दाखल झाल्या असून, पुणे मुंबई धावतही आहे. या बसमधील प्रवास लक्झरीसारखा अनुभवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
नव्या हिरकणीची आसन क्षमता 35 वरून 45 एवढी करण्यात आली आहे. जसजशा बस तयार होतील, तसतशा राज्यातील सर्वच विभागांना देण्यात येणार आहेत. नव्या हिरकणी बसला अल्युमिनिअमचा पत्रा बदलून एमएसचा (माइल्ड स्टील) वापर करण्यात येत आहे. यामुळे बस खड्ड्यातून गेली तरी पाठीमागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांना हादरा बसणार नाही. तसेच सरकते, आतून उघडणारे आणि बंद होणारे दरवाजे दिले आहेत, अशी माहिती दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक दत्तात्रेय चिकुर्डे यांनी दिली.
“लाल परी’ अशी ओळख असलेल्या एसटीची ओळख आता नव्याने बदलत आहे. लाल रंगाच्या बहुतांश जुन्या एसटी बसच्या एवजी आता नवीन बस स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून धावत आहे. तसेच प्रवाशांना एसी आणि अलिशानमध्ये प्रवास करण्यासाठी शिवनेरी आणि शिवशाहीमध्ये ई-बस सुरू करण्यात आल्या आहेत. नवीन एसी बसची संख्या वाढत असल्यामुळे बहुतांश मार्गावर ई-बस धावत आहेत.
“लाल परी’ अशी ओळख असलेल्या एसटीची ओळख आता नव्याने बदलत आहे. लाल रंगाच्या बहुतांश जुन्या एसटी बसच्या एवजी आता नवीन बस स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून धावत आहे. तसेच प्रवाशांना एसी आणि अलिशानमध्ये प्रवास करण्यासाठी शिवनेरी आणि शिवशाहीमध्ये ई-बस सुरू करण्यात आल्या आहेत. नवीन एसी बसची संख्या वाढत असल्यामुळे बहुतांश मार्गावर ई-बस धावत आहेत.
नव्या हिरकणी बसची वैशिष्ट्ये
- बसच्या पाठीमागील चाकास एअर सस्पेन्शन
- छत, हॅट रॅक (साहित्य ठेवण्याची जागा) आणि सीट यांना एकच रंगसंगती
- आसनाजवळ मोबाइल चार्जिंगची सुविधा
- चालक किंवा वाहकाला प्रवाशांना काही सूचना द्यायच्या असल्यास उद्घोषणा प्रणाली विकसित
- आत गडद चॉकलेटी, लाइट चॉकलेटी व ऑफ व्हाइट अशा तीन रंगसंगती
- वाहकाला सर्वांत पुढे स्वतंत्र आसन आणि जवळच तिकीट मशिन चार्जिंगची सोय





