चिंबळी (पुणे) -खेड तालुक्यातील मेदनकरवाडी व चाकण परिसरामध्ये निदान होत नसलेल्या नवीन आजाराची साथ आली आहे. यापासून नागरिकांना भयंकर त्रास होत असल्यामुळे योग्य ते उपचार मिळण्याबाबत मेदनकरवाडीचे माजी सरपंच व खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास मेदनकर यांनी जिल्हा परिषद पुणे, गट विकास अधिकारी तसेच आरोग्य अधिकारी खेड व प्राथमिक आरोग्य केंद्र करजविहीरे यांना निवेदन दिले आहे.
गेल्या एक महिन्यापासून चाकण व मेदनकरवाडी परिसरात नागरिकांना अंगदुखी, जॉइंट दुखणे, सूज येणे, उठता बसता न येणे व प्लेट्स कमी होणे आदी समस्या उद्भवत आहेत. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया व कोविड यांसारख्या सर्व तपासण्या निगेटिव्ह येत आहेत. हा आजार गेल्या एक महिन्यापासून मेदनकरवाडी, चाकण परिसरात लहान मुलांपासून ते महिला, ज्येष्ठ, वयोवृद्ध नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे आल्या आहेत. तरी या आजाराची सखोल तपासणी करून उपचार करण्यात यावेत, अशी मागणी माजी सरपंच रामदास मेदनकर निवेदनाद्वारे केली आहे.