इंदापूर : शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांपर्यंत शासकीय योजना सक्षमपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील-ठाकरे यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीत महिला सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण यांसह विविध विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती अंकिता पाटील यांनी यावेळी मंत्री तटकरे यांना दिली. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांना चालना देणे, पोषण अभियान राबवणे आणि बालकांच्या शैक्षणिक सुविधांचा दर्जा सुधारणे यावर आगामी काळात अधिक भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमांबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ते मार्गदर्शन केले. तसेच, पुणे जिल्ह्यात महिला व बालविकासाचे विविध प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक निधी आणि सर्वतोपरी सहकार्य पुरवले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून महिला व बालकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा मानस सभापती अंकिता पाटील-ठाकरे यांनी शेवटी व्यक्त केला. हेही वाचा : Pune District : शिक्रापूर पोलिसांच्या कर्तव्यावरच प्रश्नचिन्ह; तळेगावात ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद, नागरिक संतप्त