नवी दिल्ली : कोरोनाची साथ पसरल्यापासून देशात रविवारपर्यंत 35 हजार जणांची चाचणी घेण्यात आली, अशी माहिती इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या वतीने देण्यात आली.
देशांत कोरोनाची चाचणी घेण्यासाठी 113 सरकारी आणि 47 खासगी लॅबरोटरींना परवानगी देण्यात आली आहे, असे डॉ. रमण गंगाखेडखर यांनी सांगितले. आम्ही चाचणी घेण्याची क्षमता वाढवत आहोत. देशातील सर्व बाधितांना शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
सध्या 150 पेक्षा अधिक लॅबमध्ये कोरोनाची चाचणी घेतली जात आहे. असे सांगून ते म्हणाले, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या बाधेमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 109 जणांना नव्याने बाधा झाली आहे. आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या विषाणूूंच्या बाधेमुळे व्हॅंटीलेटरची कमतरता जाणवत असून त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यात अडचण येत आहे का? असे विचारता आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले,सध्या व्हेंटिलेटर असणाऱ्या नेमक्या रुग्णांची नेमकी संख्या आता उपलब्ध नाही. याबाबत राज्य सरकारकडून लक्ष ठेवण्यात येत आहेत. वय, बाधितांशी संपर्क अशा गटातल्या रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.
गेल्या 24 तासात 106 नवे बाधित सापडले असून 25 जणांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.