Rajnath Singh – जागतिक राजकारणातील वाढता तणाव आणि पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि इटलीने आपल्या संरक्षण संबंधांना एक नवी उंची दिली आहे. गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी लष्करी उपकरणांच्या सह-उत्पादन आणि सह-विकस करण्यासाठी एक भक्कम संरक्षण औद्योगिक आराखडा तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इटलीचे संरक्षण मंत्री ग्विडो क्रोसेटो यांच्यात झालेल्या या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील सहकार्यासाठी लष्करी सहकार्य योजना २०२६-२७ चे अनावरण करण्यात आले. Rajnath Singh भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला इटलीच्या संरक्षण सहकार्य उपक्रमाची जोड देऊन, भविष्यात अत्याधुनिक युद्धनौका, क्षेपणास्त्रे आणि इतर तंत्रज्ञान विकसित करण्यावर दोन्ही नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, या चर्चेत केवळ द्विपक्षीय संबंधच नव्हे, तर पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि इतर जागतिक आव्हानांवरही सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देश प्राचीन समुद्री राष्ट्रे असल्याने हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी गुरुग्राम येथील इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटरच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण अधिक वेगवान करण्यावर या वेळी सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, भारत आणि इटलीची धोरणात्मक भागीदारी शांतता, स्वातंत्र्य आणि परस्पर आदराच्या मूल्यांवर आधारित आहे. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दोन्ही देशांच्या नौदलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे.