नेवासा: भालगांव जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांनी चुलीवर भाकरी आणि वांग्याचे भरीत बनवून अनोखी स्पर्धा पार पाडली. कार्यानुभव उपक्रमांतर्गत स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा आणि आईच्या कष्टाची जाणीव व्हावी म्हणून हा उपक्रम शिक्षक राहुल आठरे यांच्या संकल्पनेतून झाला. 22 विद्यार्थ्यांचे तीन गट करून त्यांनी घरून पीठ, तवा, सरपण आणले आणि शाळेत चूल मांडून भाकरी थापल्या. शिक्षिका सरस्वती लोंढे, मनीषा साळवे यांनी मार्गदर्शन केले. वांगे भाजून, कोथिंबीर, कांद्याचे भरीत तयार करत विद्यार्थ्यांनी सांघिक भावनेने जेवणाचा आस्वाद घेतला. या उपक्रमाने मुलांमध्ये आत्मविश्वास आणि समानतेची भावना वाढली. श्रावणी निमसे म्हणाली, “धुरामुळे आईच्या कष्टाची आठवण झाली.” गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, मुख्याध्यापिका सरिता सावंत, पालकांनी कौतुक केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करत असल्याचे दिसून आले.