नेवासा – महाविकास आघाडीचे दिग्गज नेते माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख – पाटील यांनी विधानसभा निवडणुक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच लढवावी, असे विधान माजी आमदार पांडूरंग अभंग यांनी केले आहे. नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या व्यावसायिक गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार गडाख यांनीही माजी आमदार अंभग यांच्या या वाक्याला हसतमुख संमती दर्शविले आहे. यामुळे गडाख आता मशालवरच विधानसभा निवडणुक लढविण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचे म्हंटले जात आहे. महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख – पाटील मागील निवडणुक स्वबळावर लढवून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बिनशर्त पाठींबा देऊन ठाकरे घराण्यावर असलेली श्रद्धा आणि निष्ठा उघड केलेली होती. त्या मोबदल्यातही शिवसेनेने गडाख यांना राज्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपदही दिले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आमदार गडाख हे अपक्ष लढणार की, ठाकरे शिवसेनेची मशाल हाती घेणार याबाबत नेवासा विधानसभा मतदार संघात प्रचंड उत्सुकत्ता निर्माण झाली होती. अशातच माजी आमदार पांडुरंग अंभग यांनी आमदार गडाख हे या निवडणुकीत मशाल चिन्हावरच निवडणुक लढविणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना पुर्णविराम मिळाला असे म्हंटले जात आहे.