नेवासा: श्रीराम नवमी उत्सवात “रामगावा” भक्ती संगीताने वेधले भाविकांचे लक्ष

नेवासा – नेवासा येथील जुन्या पेठेजवळील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सव सप्ताहाचे औचित्य साधून मंगळवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित “रामगावा” भक्ती गीतांच्या कार्यक्रमाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. येत्या रविवारी (दि. 6 एप्रिल) रामनवमी आहे. स्वरमाधुरी गायन ग्रुपच्या मुख्य गायिका माधुरी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या प्रभू रामचंद्रावरील भक्ती गीतांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
श्रीराम मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या कार्यक्रमात छाया गुजराती, माया गुजराती, सुरेखा गुजराती, ज्योती गुगळे आणि सुचित्रा परदेशी या सहगायिकांनी उत्कृष्ट साथ दिली. तबल्यावर सुनील शिंदे सुरेगावकर आणि हार्मोनियमवर ज्ञानेश्वर माऊली काळे यांनी संगीत दिले. या भक्तिमय संध्येला रामचरितमानस कथाकार हभप बाळासाहेब महाराज नाईक, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ जगताप, डॉ. गीताराम कुलकर्णी, सुरेखाताई बल्लाळ, कृष्णाभाऊ डहाळे, जयकुमार गुगळे, प्रदीप औटी, नितीन कुलकर्णी, मंदिराचे विश्वस्त रामजी प-हे, सेवेकरी अंकुश लवडकर, अशोक डहाळे यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे माधुरी कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. या भक्ती संगीताने उपस्थितांना प्रभू रामचंद्राच्या चरणी रममाण करून आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली.





