नेवासा: पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण; ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

नेवासा – नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर गावात २५ एकर शेतीमध्ये पोल्ट्री फार्म आहे. या पोल्ट्रीमुळे बऱ्हाणपूर, चांदा, रस्तापूर अशा तीन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात माशांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी गावातील लोकांना जेवण करणे, जनावरांचे दूध काढणे कठीण झाले आहे. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
बाधित ग्रामस्थांनी भाजप नेते ऋषिकेश शेटे यांच्याशी संपर्क करुन समस्या सांगितल्यानंतर शेटे ग्रामस्थांसह पोल्ट्रीफार्मवर गेले असता तेथे आक्षेपार्ह गोष्टी निदर्शनास आल्या. मयत झालेल्या कोंबड्या उघड्यावर टाकून दिल्या होत्या. ह्या कोंबड्या गावातील कुत्रे घेऊन जात व गावात टाकून देत असे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व आजाराचे प्रमाण वाढले आहे. या माशांचे प्रमाण इतके जास्त आहे की तीन गाव यामध्ये व्यापले गेले आहेत.
शेटे यांनी त्वरित जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, डीएचओ अधिकारी, पोलीस, सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली. दहा दिवसाची मुदत देण्यात आली असून जर दिलेल्या मुदतीत संबंधित पोल्ट्रीवर कारवाई न झाल्यास, कंपनी बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.





