Newasa : नेवासा फाट्यावर दीड तास रस्ता रोको; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविल्याचा निषेध
Nevasa : तेलकुडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ नेवासे फाट्यावर दीड तास रस्ता रोको करण्यात आला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या.

Newasa : तेलकुडगाव (ता. नेवासा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटविल्याच्या निषेधार्थ सोमवारी नेवासा फाटा येथे सुमारे दीड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बचाव कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यामुळे नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दुपारी १२ वाजता राजमुद्रा चौक ते डॉ. आंबेडकर चौक परिसरात आंदोलनाला सुरुवात झाली. रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी पुतळा काही दिवसांत सन्मानपूर्वक पूर्वीच्या जागी बसवावा, अशी मागणी केली. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य नेते प्रा. किसन चव्हाण यांनी पुतळा कोणाच्या आदेशाने आणि परवानगीने हटविण्यात आला, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी केली. पुतळा पुन्हा त्याच जागी बसविला नाही, तर तेलकुडगाव येथे जाऊन पुतळा बसविण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनाचे नेतृत्व रिपाईचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे, शहराध्यक्ष पप्पू इंगळे आणि वंचितचे तालुकाध्यक्ष पोपट सरोदे यांनी केले. आंदोलकांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी स्वीकारले. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, युवक-युवती आणि भीमसैनिक सहभागी झाले होते. पोलीस बंदोबस्तात आंदोलन संपल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
‘पुतळ्याला धक्का लागला तर गाठ आमच्याशी’ –
निळ्या टोप्या घातलेले शेकडो रिपाई कार्यकर्ते आणि भीमसैनिक आंदोलनात सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला धक्का लागल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.




