Nevasa News – नेवासे येथील सरकारी धान्य गोदामात रेशनकार्डावर मोफत धान्य योजनेचा वाटप करण्यासाठी आलेला 280 क्विंटल गहू हा धान्य पुरवठा वाहतूक कंत्राटदराने चक्क ओला करून आणला. हा गहू सरकारी गोडाऊनमध्ये खाली करून घेण्यासाठी येथील गोडाऊन किपरने नकार देऊन संबंधित घटनेची तक्रार थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. मात्र कंत्राटदराने ओला गहू हा धान्य गोदामात टाकून निघून गेल्यामुळे आता हा गहू सुकल्यानंतर मापात होणारी घट ही नेमकी कोणाच्या माथ्यावर पडणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. गोरगरिबांच्या पोटासाठी दोन वेळचे, दोन घास अन्न त्यांना सुखासमाधानाने मिळाले पाहिजे, या भावनेतून केंद्र सरकारतर्फे स्वस्त धान्य दुकानातून गहू आणि तांदूळ दिला जात असतो. अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील कुटुंबांना २० किलो धान्य मोफत दिले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील जवळपास ५० टक्के धान्य थेट बाजारात विकले जात असल्याचे आढळून येते आहे. या योजनेचा लाभ नेमका कोणाला होतो, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला जात असून, गोरगरिबांच्या टाळूवरील लोणी खाणारी मोठी टोळी जिल्ह्यात कार्यरत असून “करून जातो दाढीवाला आणि धरला जातो मिशावाला” या सदरात ही धान्यतस्करी सुरू आहे. रेशन कार्डावर मोफत वाटप करण्यासाठी नेवाशाच्या सरकारी गोदामात 280 क्विंटल आलेला गहू हा कंत्राटदाराने ओला करून आणल्यामुळे हा गहू सुकल्यानंतर पुन्हा मापात होणारी घट कोण भरून काढणार? आणि स्वस्त धान्य दुकानदार हा कमी माप असलेला गहू कसा स्वीकारणार? असा सवाल गोडाऊन किपरने उपस्थित केला आहे. वाहतूक कंत्राटदाराने ओला करून आणलेला गहू माप बरोबर भरण्यासाठी वजन वाढविण्यात आलेले असले तरी या हा गहू काढून मापात पाप केले असल्याची शंका येत आहे. हा माल नेमका कुठं हडप केला? असा संतप्त सवालही रेशन कार्डधारकांतून उपस्थित केला जात आहे.