Newasa : नेवासा नगरपंचायतीचा कारभार अंधारात; वीजबिल थकल्याने तीन दिवसांपासून वीज बंद
Newasa : नेवासा नगरपंचायतीचे वीजबिल थकल्याने कार्यालयाचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. संगणक, इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत.

Newasa : नेवासा नगरपंचायतीच्या कार्यालयाचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित आहे. वीजबिल थकल्यामुळे महावितरणने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीचा दैनंदिन कारभार ठप्प झाला असून नागरिकांची विविध कामे खोळंबली आहेत.
नगरपंचायतीकडे वीजबिलाची थकबाकी होती. बिल भरण्याबाबत महावितरणकडून सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
वीज नसल्याने कार्यालयातील संगणक, प्रिंटर आणि इंटरनेट सेवा बंद आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यू दाखले, घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम परवाने यांसह नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. तसेच वरिष्ठ कार्यालयांकडून येणारे ई-मेल आणि शासकीय पत्रव्यवहार तपासण्यातही अडचणी येत आहेत.
या प्रकारामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्यालयाचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले बिल वेळेवर का भरले गेले नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे. थकित वीजबिल तातडीने भरून वीजपुरवठा पूर्ववत करावा आणि नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.





