प्रभात वृत्तसेवा नेवासे – नेवासे नगरपंचायत निवडणुकीत प्रचाराचा धुराळा आता चांगलाच शिगेला पोहचलेला असून, बहुतांशी उमेदवार आपले शक्तीप्रदर्शन करण्यासाठी महिलांना चक्क रोजंदारीवर कामाला ठेवत प्रचारात सामील करून घेत आहेत. या महिलांना दोन वेळचा अल्पोपहार, दुपारचे जेवन देऊन त्यांना प्रभाग फेरीसाठी तीनशे ते चारशे रुपये रोज देत आहे. जिकडे रोजंदारी जादा तिकडे या महिला प्रचार करत असल्यामुळे एकीकडेच्या महिला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच उमेदवारांचा प्रचार करत असल्यामुळे मतदार बंधू-भगिनींचाही या निवडणूक काळात चांगलाच विरंगुळा होताना दिसून येत आहे.हल्लीच्या युगात निष्ठावान कार्यकर्त्यांची संख्या कमी होत असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची नेतेमंडळी मनधरणी करत आहे. आपल्या प्रचारफेरीत मोठे शक्तीप्रदर्शन दाखविण्यासाठी महिला वर्गांनाही रोजंदारीवर कामाला ठेवून उमेदवारांकडून आपला प्रचार उरकावून घेतला जात आहे. या नगरपंचायत निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांपेक्षा चालबाज मंडळींना राजकीय रणांगणात मोठे महत्व प्राप्त झालेले असून, निष्ठावानापेक्षा चालबाज कार्यकर्त्यांची उमेदवार मनधरणी करताना दिसून येत आहे. नगरपंचायत निवडणुकीत हातावर पोट असणाऱ्या महिलांना प्रचाराचा रोजगार मिळत असल्यामुळे जो उमेदवार चांगली रोजंदारी देईल त्याच्या प्रचारात त्या सामील होत असल्यामुळे एका उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या महिला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच उमेदवारांचा प्रचार करत असल्यामुळे मतदारांचाही राजकीय फडात चांगलाच विरंगुळा होताना दिसून येत आहे.