नेवासा : ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत रुग्णांमध्ये नाराजी

नेवासा – नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ढिसाळ बनत चालली आहे. रुग्णालयात आलेल्या बाह्य रुग्णांवर आजाराचे निदान करतांना वैद्यकिय मंडळींकडून रुग्णांच्या अंगाला साधा हातही न लावता केवळ रुग्णांचे हावभाव पाहून रुग्णांना गोळ्या – औषधे लिहून दिली जात आहे. आजाराचे निदान होत नसल्यामुळे वैद्यकिय अधिकाऱ्यांविरुद्ध रुग्णांमध्ये नाराजी दिसून येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाची सुधारणा करण्याची मागणी रुग्ण आणि नातेवाईकांकडून केली जात आहे.
नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात आजाराचे निदान करण्यासाठी लहान मुले, स्री-पुरुष व वयोवृद्ध मंडळी मोठ्या प्रमाणावर येत असतात. तसेच डोळे तपासणी व प्रसुतीसाठी महीला मोठ्या प्रमाणावर येथे आंतर रुग्ण विभागात दाखल होतात. मात्र येथे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. रुग्णांची गैरसोय होत आहे.
राज्य शासन आरोग्य विभागावर सरकारी तिजोरीतून भरमसाठ पैसे खर्च करत असतांना प्रत्यक्षात येथील रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर आजाराचे निदान होत नसून अंगाला हात न लावता केवळ औषधे लिहून दिली जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्य व्यवस्थेवर नाराजी दिसून येत आहे. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर उपचारापुर्वीच येथे नेमणुकीस असलेल्या नर्स स्टाफकडून रुग्णांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचेही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.





