नेवासा: नागापूर शिवारात बेकायदा दारुगोळा साठ्याचा धोका; ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

नेवासा – नेवासा तालुक्यातील नागापूर शिवारात बेकायदा दगडखाण आणि गौण खनिज उत्खननासाठी भू-सुरुंगाचे स्फोट घडवण्याकरिता लागणारा दारुगोळ्याचा मोठा साठा तीन-चार ठिकाणी बंदिस्त केल्याने परिसरात पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुर्दैवाने याचा स्फोट झाल्यास जवळची चार-पाच गावे उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे. या साठ्यावर कारवाई करून दारुगोळा तातडीने नष्ट करण्याची मागणी नागापूर-राजणगाव परिसरातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
नागापूर शिवारात दगडखाण आणि गौण खनिज उत्खननासाठी दारुगोळ्याचा मोठा साठा चार-पाच घरांमध्ये बंदिस्त केलेला आहे. या गोडाऊनच्या छतावर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी लोखंडी पाइप बसवले असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती आहे.
परिसरातील काही गावांमध्ये ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय अवशेष असून, स्फोट झाल्यास त्यांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देत दारुगोळा साठवणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि साठा नष्ट करण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





