नेवासा : छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणाऱ्या एस.टी. बसमधील प्रवाशाची बॅग चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला नेवासकरांनी पकडून चांगलाच चोप दिला. शनिवारी (१० मे) सायंकाळी ५ वाजता नेवासा बसस्थानकात ही घटना घडली. चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेत बसस्थानकापासून पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढली. शिर्डीला जाणाऱ्या एका जोडप्याने आपली बॅग बसमध्ये ठेवली होती. बस नेवासा आगारात येताच मागे बसलेल्या एका प्रवाशाने ती बॅग उचलून पळ काढला. जोडप्याने ‘पकडा-पकडा’ असा आवाज देताच स्थानिकांनी चोरट्याला पकडून मारहाण केली. नेवासा पोलिस ठाण्याचे उपाधीक्षक संतोष खाडे यांना खबर मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेतले. बॅग मालकांनी तक्रार नोंदवली नाही, तरी पोलिसांनी कारवाई केली. चोरटा एका कंपनीत नोकरीला होता, परंतु नोकरी गेल्याने संतापातून हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याला अद्दल घडवली.