नेवासा – ‘एक कदम स्वच्छता की ओर’ असा मोठा संदेश प्रवेशद्वारावर मिरवणाऱ्या नेवासा तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीला सध्या अस्वच्छतेने ग्रासले आहे. कार्यालयाच्या आवारात पसरलेला कचरा, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती आणि शौचालयांची झालेली दुरवस्था पाहून, “स्वच्छतेचे धडे देणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या कार्यालयाचा विसर पडला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. भिंतींवर गुटख्याचे ‘कलाकाम’ नेवासा तालुक्याचे दंडाधिकारी कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीत ठिकठिकाणी तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. पांढऱ्याशुभ्र भिंती आता लाल रंगाने माखल्या असून, यामुळे इमारतीचे विद्रुपीकरण झाले आहे. कार्यालयाच्या कोपऱ्या कोपऱ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून कामासाठी येणाऱ्या जनतेला नाकाला रुमाल लावून वावरावे लागत आहे. शौचालयांची दुरवस्था आणि दुर्गंधी केवळ आवाराच नव्हे, तर विशेषतः पुरुषांच्या शौचालयाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तिथे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे मोठी दुर्गंधी निर्माण झाली असून, आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सरकारी नियम सांगणारे प्रशासन स्वतःच्याच कार्यालयातील या घाणीकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येते. फलक ठरतोय थट्टेचा विषय इमारतीच्या दर्शनी भागात ‘एक कदम स्वच्छता की ओर’ हा सुविचार मोठ्या दिमाखात लिहिला आहे. मात्र, आतील वास्तव याच्या अगदी उलट असल्याने हा सुविचार सध्या येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या थट्टेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे. तालुक्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतीची ही अवस्था पाहून जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून, वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे.