नेवासा तालुक्‍याला चक्रीवादळासह गारांचा तडाखा

नेवासे  – नेवासे तालुक्‍यातील माका, तेलकूडगाव, है. जेऊर, देडगाव, देवसडे परिसरातील गावांना चक्रीवादळासह गारांचा तडाखा बसला. अनेक घरांचे पत्रे उडाली तर अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. वादळाबरोबरच देडगावमध्ये गारांचा जोराचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे दुष्काळात प्रचंड नुकसान झाले. या पडझडीचा तत्काळ पंचनामा करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी केली आहे.

अचानक सुरू झालेल्या वादळाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांचे कांदे पावसाने ओले झाले. अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटल्या. तर काही ठिकाणी विद्युत वाहक तारांचे पोल जमीनदोस्त झाले आहेत. तेलकूडगाव, देवसडे, जेऊर, देडगाव, माका या परिसरात रिमझिम पाऊस झाला तर देडगाव व तेलकूडगाव परिसरात तब्बल 20 ते 25 मिनिटे गारा पडल्याने जनावराचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

देवसडे येथील प्रगतशील शेतकरी बबनराव पिसोटे यांचे सेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे पीक होते. मात्र शुक्रवारच्या वादळाने त्यांचे पीक जमिनोदोस्त झाले. जेऊरमध्ये सुखदेव ताके, माऊली ताके, बंडू ताके, कारभारी ताके, गणपत खोसे, जिल्हा परिषद ताके वस्ती शाळा तसेच नरेंद्र महाराज हायस्कूल, बद्री म्हस्के, विजय ताके, किसान ताके यांच्या राहत्या घराचे व जनावरांच्या शेडचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. तर अण्णासाहेब म्हस्के यांच्या ट्रॅक्‍टरवर झाडे पडून ट्रॅक्‍टरचे नुकसान झाले. तेलकुडगावमध्ये बबन गटकळ यांच्या घरावर झाड पडले तर दत्तात्रय घाडगे यांचे पत्रे उडाल्याने त्यांच्या मातोश्री किरकोळ जखमी झाल्या, जिल्हा परिषद शाळेतील मोठी झाडे पडली आहेत. या गावांच्या परिसरात विद्युत वाहक तारा तसेच मुख्य वाहिनीचे नुकसान होऊन पोल वाकले आहेत. तर ट्रान्सफार्मर देखील उन्मळून पडल्याने या परिसरातील वीज गायब झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अनेकांचे हाल झाले आहे.

वादळाचा तडाखा बसून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.

महेश म्हस्के, शेतकरी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.