Ranjangaon Ganpati : कोंढापुरीत महामार्गाला भेगांचे जाळे
Ranjangaon Ganpati : महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असताना रस्त्याला पडलेल्या भेगा आणि झुकलेला कठडा याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष का जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

रांजणगाव गणपती : पुणे- नगर महामार्गावरील कोंढापुरी परिसरात रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून रस्त्याचा काही भाग तुटण्याच्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे महामार्गालगतचा संरक्षक कठडाही एका बाजूला झुकल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता हा महामार्ग निकृष्ट कामाचा नमुना ठरत असल्याची चर्चा वाहनचालकांमधून होत आहे.
महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावत असताना रस्त्याला पडलेल्या भेगा आणि झुकलेला कठडा याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष का जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच दुरुस्ती न झाल्यास रस्ता खचून मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्गाचे काम करण्यात येते, तर दुसरीकडे काही काळातच रस्त्याला भेगा पडून संरक्षक कठडे झुकत असतील, तर कामाच्या दर्जाबाबत आणि देखभालीबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कामाच्या गुणवत्तेची तपासणी झाली होती का? संबंधित ठेकेदाराकडून दोष दायित्व कालावधीत दुरुस्ती करून घेतली जाणार आहे का? असे प्रश्नही उपस्थित होत आहे.
संपूर्ण कामाचे तांत्रिक ऑडिट करा
रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून भेगांची तातडीने दुरुस्ती करावी, झुकलेल्या संरक्षक कठड्याची सुरक्षितता तपासावी आणि संपूर्ण कामाचे तांत्रिक ऑडिट करावे, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. लोकप्रतिनिधींनीही गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला जाब विचारण्याची गरज आहे. प्रशासनाने संभाव्य अपघाताची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा महामार्गावरील निष्काळजीपणाची मोठी किंमत वाहनचालकांना मोजावी लागणार आहे.





